मुंबई : ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणात दररोज नवीन आणि खळबळजनक माहिती समोर येत आहे.या प्रकरणातील मुख्य आरोपी पप्या शिंदे हत्येच्या दिवशी नेहमीप्रमाणे चप्पल न घालता थेट बूट घालून कार्यालयात आला होता. याचे धक्कादायक कारण आता समोर आले आहे

विशेष म्हणजे, मारेकऱ्यांना आत प्रवेश मिळण्यासाठी आणि दरवाजा बंद करता येऊ नये म्हणून त्याने आपला एक पाय दरवाजाच्या मध्ये अडकवून धरला होता. ठरल्याप्रमाणे संतोष कनोजिया आणि नितेश पवार यांनी कार्यालयात येऊन पूर्णेकर यांच्यावर बेछूट गोळीबार केला, तर निखिल यादव आणि अमित सिंग यांनी चॉपरने सपासप वार करून त्यांची हत्या केली. गुन्ह्यानंतर पळून जाण्यासाठी पप्या शिंदे याने काही अंतरावर एक अल्टो गाडीची व्यवस्थादेखील करून ठेवल्याचे तपासात पुढे आले आहे.

29 सप्टेंबरला रात्री साडेनऊच्या सुमारास मनोरमा नगर येथील कार्यालयात पूर्णेकर यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेने पप्या शिंदे, संतोष कनोजिया, अमित सिंग, निखिल यादव आणि नितेश पवार या 5 जणांना अटक केली आहे.मुख्य आरोपी पप्या शिंदे हा पूर्णेकर यांचा जुना मित्र होता. निवडणुकीच्या काळातील वादानंतर तो गणपतीपासून पुन्हा त्यांच्याशी बोलू लागला होता. मात्र, यादरम्यान त्याने पूर्णेकरांच्या पाठीत खंजीर खुपसत हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

हत्येच्या आदल्या दिवशी पप्या शिंदे केबिनबाहेर चप्पल काढून आत गेला होता. त्यावेळी एका कार्यकर्त्याने त्याचीच चप्पल घालून बाहेर जाण्यावरून दोघांमध्ये वादही झाला होता. दरम्यान, पूर्णेकर रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर याच पप्या शिंदेने त्यांना रुग्णालयात नेण्याचे नाटक केले होते. मात्र, पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने बिंग फुटले आणि या थरारक कटाचा पर्दाफाश झाला. सध्या पोलीस या सर्व आरोपींची कसून चौकशी करत आहेत.






