पुणे : पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढवा आणि वानवडी परिसरात कारवाई करत फरार आरोपीसह अवैध दारू विक्रेत्याला ताब्यात घेतले आहे. तसेच वानवडी परिसरात मोटारसायकलवरून गांजा घेऊन जाणाऱ्या संशयितांकडून ८ किलो ८६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवायांमध्ये दारूच्या बाटल्या आणि रोख रकमेसह एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक २ चे अधिकारी आणि कर्मचारी कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एनडीपीएस कायद्याच्या गुन्ह्यात सुमारे एक वर्षापासून फरार असलेला इम्रान तनवीर शेख (वय २९, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) हा त्याच्या घरी आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २१(ब) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल आहे.

यानंतर पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत कोंढवा परिसरातील कमेला येथे स्लेटर हाऊसच्या भिंतीलगत पिंपळाच्या झाडाखाली एक व्यक्ती देशी दारूची अवैध विक्री करत असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत फैजु कादर शेख (वय ५३, रा. साळुंखे विहार रोड, कमेला, कोंढवा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८ हजार ११० रुपये किमतीच्या टँगो पंच देशी दारूच्या बाटल्या आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोसावी वस्ती, नवीन म्हाडा इमारतीजवळ पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत होते. यावेळी दोन संशयित व्यक्ती मोटारसायकलवरून निळ्या रंगाची बॅग घेऊन जात असून, त्यामध्ये अमली पदार्थ असल्याची माहिती पोलीस अंमलदारांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी गोसावी वस्ती येथे मोटारसायकल अडवली. मोटारसायकल चालक अल्ताफ ऊर्फ अयाज अकबर शेख (वय १९, रा. न्यू म्हाडा कॉलनी, सुरक्षानगर, हडपसर) याला ताब्यात घेण्यात आले. पंचांसमक्ष केलेल्या झडतीमध्ये त्याच्याकडील निळ्या बॅगेत तसेच मोटारसायकलच्या डिक्कीत गांजा आढळून आला.
पोलिसांनी एकूण ८ किलो ८६० ग्रॅम गांजा जप्त केला असून, त्याची किंमत ४ लाख ४३ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन माने, सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण, नितीनकुमार नाईक तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक २ मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.






