पुणे : खेड येथील हॉटेल व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागणे आणि खंडणी न दिल्याने त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील दोन फरार आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. मयूर तानाजी हजारे (रा. कनेरसर, ता. खेड) आणि गणेश दिलीप गोरडे (रा. गोसासी, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. खेड सिटी एमआयडीसी परिसरातून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २६३/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३, आर्म्स ॲक्ट आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्यातील आरोपींनी बेकायदा जमाव जमवून फिर्यादीच्या हॉटेलमध्ये प्रवेश केला. हॉटेलचा व्यवसाय चांगला सुरू असल्याचे सांगत आरोपींनी दरमहा हप्ता देण्याची मागणी केली. पैसे न दिल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही दिली. फिर्यादीने खंडणी देण्यास विरोध केला असता आरोपींनी पिस्तूल काढून जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्यावर गोळीबार केला. पिस्तुलातून दोन गोळ्या झाडण्यात आल्या; मात्र फिर्यादीने प्रसंगावधान राखत गोळ्या चुकवल्या.

त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दगड आणि लाकडी दांडक्याने हॉटेलसमोरील कुंड्या, चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले.

हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मयूर हजारे आणि गणेश गोरडे हे दोघेही फरार झाले होते. अटकेपासून बचाव करण्यासाठी ते वारंवार राहण्याची ठिकाणे बदलत असल्याने पोलिसांना त्यांचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. आरोपी खेड सिटी एमआयडीसी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींविरुद्ध यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये शिक्रापूर पोलीस ठाण्यातील २०१९ मधील खून, अपहरण आणि पुरावा नष्ट करण्यासंबंधीचा गुन्हा, तसेच खेड पोलीस ठाण्यातील २०२४ आणि २०२५ मधील मारहाण, धमकी आणि इतर गुन्ह्यांचा समावेश आहे. सध्याच्या खंडणी आणि गोळीबाराच्या प्रकरणातही त्यांच्यावर मोक्कासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि खेड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहायक पोलीस उपनिरीक्षक शरद बांबळे, पोलीस हवालदार संदीप फड, स्वप्नील गाढवे आणि हनुमंत ढोबळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास खेड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे करीत आहेत.







