पुणे : पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षकाने दारूच्या नशेत पहाटे पोलीस ठाण्यात येऊन गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. राजेश खांडवे असे संबंधित पोलीस निरीक्षकाचे नाव असून, ते सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक (क्राईम पीआय) म्हणून कार्यरत आहेत. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेश खांडवे हे पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास सहकारनगर पोलीस ठाण्यात आले होते. त्यावेळी ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप आहे. त्यांनी पोलीस ठाण्यात आरडाओरडा करत गोंधळ घातला. पहाटे दोन ते अडीच वाजेपर्यंत हा प्रकार सुरू होता.
या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर खांडवे यांना आवरण्यात आले. या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आणि सकाळी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेमुळे पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस ठाण्यात जबाबदार पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याकडूनच असा प्रकार घडल्याने पोलीस दलात चर्चा सुरू झाली आहे. सुरुवातीला या प्रकरणाबाबत वरिष्ठ अधिकारी बोलण्यास तयार नव्हते. मात्र, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनंतर अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती देण्यात आली.

याबाबत पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात क्राईम पीआय यांनी मद्यप्राशन करून गोंधळ घातल्याचा प्रकार घडल्याचे स्पष्ट केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, राजेश खांडवे यांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले होते.






