अलिबाग : येथील वरसोलीच्या एका लॉजवर फिरण्यासाठी आलेल्या 25 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, हा तरुण त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत लॉजवर थांबला असताना ही दुर्घटना घडली. या संपूर्ण प्रकरणात एका महिला डॉक्टरने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळताच मृतदेह परस्पर नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यामुळे प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील कोर्लई येथील हा तरुण आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत वरसोली समुद्रकिनारी फिरण्यासाठी आला होता. त्यांनी वरसोली येथील ‘लोटस लॉज’वर रूम बुक केली होती. यादरम्यान अचानक प्रकृती बिघडल्याने किंवा इतर कारणांमुळे त्या तरुणाचा मृत्यू झाला. घटनेनंतर सोबत असलेली तरुणी आणि नातेवाईकांनी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला.

जेव्हा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला, तेव्हा अपघात विभागात डॉ. भैरवी मालवणकर ड्युटीवर होत्या. नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्याची इच्छा नसल्याचे सांगितल्यानंतर, या महिला डॉक्टरने कोणतेही लेखी पत्र न घेता आणि जिल्हा शल्यचिकित्सकांची परवानगी न घेताच मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला. नियमांनुसार अशा संशयास्पद प्रकरणात शवविच्छेदन करणे बंधनकारक असतानाही, या प्रक्रियेला बगल देण्यात आल्याने डॉक्टरच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

डॉ. मालवणकर यांनी पोलिसांना फोन केला होता, परंतु पोलीस पोहोचण्यापूर्वीच नातेवाईक मृतदेह घेऊन निघून गेले. मृतदेह परस्पर नेल्यामुळे संशय अधिकच बळावला. त्यानंतर रुग्णालयाने संपर्क साधल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह पुन्हा रुग्णालयात आणला. अखेर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी ‘व्हिसेरा’ सुरक्षित ठेवून तो फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी अलिबाग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून कसून तपास सुरू केला आहे.







