पुणे : दोन वर्षांपूर्वी झालेल्या मारहाणीचा राग मनात धरून एका २१ वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. वढू खुर्द येथील आमदारनगर परिसरात १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे.

विकासकुमार अनुपकुमार श्रीवास्तव (वय २१, रा. कोरेगाव भीमा) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचा भाऊ आकाशकुमार अनुपकुमार श्रीवास्तव (वय २३) यांनी याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकासकुमार हा आपल्या वडिलांसोबत एमआयडीसीमधील एका कंपनीत काम करत होता. आरोपी अल्पवयीन मुलांनी दहावीनंतर शिक्षण सोडले होते. त्यापैकी एका मुलाला विकासकुमारने दोन वर्षांपूर्वी मारहाण केली होती. त्यावेळी या घटनेची पोलिसांत तक्रार करण्यात आली नव्हती. मात्र, चार ते पाच दिवसांपूर्वी काही कारणावरून विकासकुमार आणि संबंधित मुलामध्ये पुन्हा वाद झाला होता.

या वादाचा राग मनात ठेवून संबंधित अल्पवयीन मुलाने अन्य दोन मुलांच्या मदतीने विकासकुमारला मारण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी विकासकुमार वढू खुर्द येथील आमदारनगर परिसरात थांबला असताना तिघांनी त्याला घेरले. त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर, मानेवर, गळ्यावर आणि छातीवर कोयत्याने वार करण्यात आले. या हल्ल्यात विकासकुमारचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक स्वाती खेडकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.







