पुणे: रस्त्याच्या कडेला वाहन उभे केल्यानंतर मागून येणाऱ्या वाहनांची खात्री न करता कारचा दरवाजा उघडण्याची निष्काळजीपणा किती जीवघेणा ठरू शकतो, याचे विदारक उदाहरण पुण्यात समोर आले आहे. हडपसर परिसरात कारचा दरवाजा अचानक उघडल्याने झालेल्या भीषण अपघातात २७ वर्षीय फूड डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला आहे.

मार्फत फकीर अली (वय २७) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी कारचालक रज्जाक लालासाहेब नदाफ (वय ३०) याच्याविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जुलै रोजी दुपारी मार्फत फकीर अली हा दुचाकीवरून ग्राहकाला जेवण पोहोचवण्यासाठी जात होता. त्यावेळी हडपसरमधील डी. पी. रस्त्यावर उभी असलेल्या कारमधून चालक रज्जाक नदाफ याने मागून येणाऱ्या वाहनांची कोणतीही खात्री न करता कारचा दरवाजा अचानक पूर्णपणे उघडला.

अचानक समोर आलेल्या दरवाज्याला मार्फतच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. धडकेच्या तीव्रतेमुळे तो रस्त्यावर फेकला गेला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून तो मृत्यूशी झुंज देत होता. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी मृत तरुणाचा भाऊ अब्दुल सलाम फकीर अली यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
या अपघातामुळे वाहनचालकांनी तसेच कारमधून उतरणाऱ्या नागरिकांनी दरवाजा उघडण्यापूर्वी मागून येणाऱ्या वाहनांची खात्री करणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. एका क्षणाचा निष्काळजीपणा दुसऱ्याच्या जीवावर बेतू शकतो, त्यामुळे वाहनातून उतरताना आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.







