पुणे : येत्या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण असतानाच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर दहशतवादी हल्ल्याचे सावट निर्माण झाले आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर शहरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला आहे, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, या धमकीच्या ई-मेलमध्ये महापौर कार्यालयासोबतच शहराची लाईफलाईन मानली जाणारी मुंबई मेट्रो, शाळा आणि शेअर बाजाराच्या (स्टॉक मार्केट) महत्त्वाच्या इमारतींमध्ये स्फोट घडवण्याची थेट धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या संदेशामध्ये खालिस्तानच्या समर्थनातील काही घोषणा आणि समर्थकांच्या नावांचा उल्लेख आढळल्याने सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे

येत्या स्वातंत्र्यदिनापूर्वी हे हल्ले केले जातील, असे मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे.या घटनेमुळे ज्यांची मुले शाळांमध्ये जातात आणि जे नागरिक रोज मेट्रोने प्रवास करतात, त्यांना अधिक काळजी व सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा ई-मेल नेमका कोणी आणि कोठून पाठवला, याचा शोध पोलीस आणि सायबर सेलचे पथक घेत आहे. मात्र, या प्रकरणावर मुंबई पोलीस दलाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती अथवा प्रतिक्रिया जाहीर करण्यात आलेली नाही.

मुंबईच्या महापौरांना अशा प्रकारचा धमकीचा संदेश मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 10 जून रोजीदेखील मुख्यमंत्री कार्यालय, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE), महापालिका इमारत आणि महापौर कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल आला होता. त्यावेळी शहरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.
परंतु सखोल तपासानंतर तो मेल बनावट (फेक) असल्याचे समोर आले होते. तरीही, आगामी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा संपूर्ण शहरात विशेष नजर ठेवून आहे.







