उरुळी कांचन (पुणे) : पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर परिसरात (Pune Toxic Liquor Case) खळबळ उडवून देणाऱ्या विषारी हातभट्टी दारूकांड प्रकरणाचे पडसाद आता पोलीस दलात उमटू लागले आहेत. विषारी दारू माफियाशी थेट कनेक्शन असल्याच्या गंभीर आरोपावरून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यावर मोठी कारवाई केली आहे. उरुळी कांचनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांची तडकाफडकी पोलीस मुख्यालयात (कंट्रोल) बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी धडक कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवारयांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Uruli Kanchan News)

विषारी दारू प्रकरणाचा मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापती याच्याशी उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांचे थेट कनेक्शन असल्याचे तपासात समोर आले होते. यावरून पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी रविवारी रात्रीच पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अंमलदारांना निलंबित केले होते. हा धक्का ताजा असतानाच, आज थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांची तडकाफडकी मुख्यालयात रवानगी करण्यात आल्याने पुणे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दिलेल्या तोंडी आदेशानुसार, पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या मुख्यालयात कार्यरत असलेल्या विजयमाला पवार यांची उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. आदेश मिळताच पवार यांनी आज, सोमवारी (ता. 01) तातडीने उरुळी कांचन पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला असून आपल्या कामाला सुरुवात केली आहे.
“गुन्हेगारी आणि बेकायदेशीर धंद्यांशी पोलिसांचे कनेक्शन खपवून घेतले जाणार नाही,” असा कडक संदेश या कारवाईतून पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दिला आहे. दोन पोलिसांचे निलंबन आणि थेट वरिष्ठ निरीक्षकाची उचलबांगडी झाल्याने उरुळी कांचन परिसरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान, आता नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार या उरुळी कांचन परिसरातील विषारी दारूचे जाळे आणि गुन्हेगारी कशी मोडून काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







