Baramati Bribe : पुणे, ता. 5 : सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना निंबूत (ता. बारामती) येथील तलाठी कार्यालयाशी संबंधित असलेल्या एका खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई बारामती-निरा रोडवरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ, निंबूत खंडोबाचीवाडी येथे बुधवारी (ता. 4) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईमुळे बारामती महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

सोमनाथ संपत महानवर (वय 35, रा. गडदरवाडी, पोस्ट खंडोबाचीवाडी, ता. बारामती) असे लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलेल्या खाजगी इसमाचे नाव आहे. तो तलाठी कार्यालयाशी संबंधित कोतवाल असल्याचे सांगत काम करत होता; मात्र तपासात तो प्रत्यक्षात खाजगी इसम असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी एका 31 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यवसायाने शेतकरी असून त्यांच्या मौजे निंबूत येथील गट क्रमांक 86/2 मधील 6 गुंठ्यांच्या प्लॉटची फाळणी झाली आहे. बारामती येथील उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाने संबंधित प्लॉटच्या सातबारा नोंदी करण्याबाबत तहसीलदार, बारामती यांना पत्राद्वारे कळविले होते. त्यानुसार तहसीलदारांनी 11 फेब्रुवारी 2026 रोजी निंबूत येथील तलाठी जयश्री तनपुरे यांना सातबारा नोंद करण्याचे आदेश दिले होते.
तक्रारदार यांनी 18 फेब्रुवारी रोजी निंबूत तलाठी कार्यालयात चौकशी केली असता तेथे उपस्थित असलेल्या आरोपी महानवर याने तलाठी जयश्री तनपुरे व मंडलाधिकारी मोहिते यांच्यासाठी प्रत्येक प्लॉटसाठी 5 हजार रुपये प्रमाणे चार प्लॉटसाठी एकूण 20 हजार रुपये द्यावे लागतील, अशी लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी 25 फेब्रुवारी रोजी एसीबीकडे तक्रार केली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता आरोपी महानवर याने पुन्हा लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच 3 मार्च रोजी आरोपीने तक्रारदाराला फोन करून सातबारा नोंदी झाल्याचे सांगितले आणि “पेमेंट पाठवा” असा व्हॉट्सअॅप संदेशही पाठविला. 4 मार्च रोजी झालेल्या पुढील पडताळणीदरम्यान आरोपी महानवर याने मंडलाधिकारी मोहिते यांच्यासाठी तडजोडीअंती 15 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार एसीबीने सापळा रचला.
दरम्यान, बारामती-निरा रोडवरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ आरोपीने तक्रारदाराकडून 15 हजार रुपये लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. याप्रकरणी आरोपी सोमनाथ महानवर यांच्यावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर करत आहेत.







