Baramati Accident : भिगवण : सोलापूर-पुणे महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री बारामतीजवळ भीषण अपघात (Accident) घडला. माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत हे आपल्या सहकाऱ्यांसह फॉर्च्युनर कारने प्रवास करत होते. भिगवणजवळील डाळज 2 गावाच्या हद्दीत आल्यानंतर त्यांच्या वाहनाला समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली.

हा अपघात इतका तीव्र होता की कारच्या चालक बाजूचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. धडकेमुळे कारचे मोठे नुकसान झाले असून गाडीचा पुढील भाग गंभीररीत्या तुटला. मात्र सुदैवाने या अपघातात धनंजय सावंत यांना कोणतीही मोठी दुखापत झाली नाही आणि ते सुखरूप बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय सावंत हे बुधवारी मुंबईत पार पडलेल्या भाजपच्या पक्षप्रवेश कार्यक्रमानंतर आपल्या परंडा गावी परतत होते. गुरुवारी रात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. कंटेनरचा वेग जास्त असल्यामुळे धडक खूप जोरात बसली, असे सांगण्यात येत आहे.
या अपघातात कारचालक आणि सुरक्षारक्षक किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाहतूक सुरळीत केली.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.







