पुणे: पुणे रेल्वे स्थानकावर महत्त्वाची तांत्रिक कामे करण्यात येणार असल्यामुळे रविवारी, ५ जुलै रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत तब्बल ९ तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत पुणे स्थानकातून सुटणाऱ्या तसेच पुण्यात येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात मोठे बदल करण्यात आले असून काही गाड्या पूर्णपणे रद्द, काही अंशतः रद्द तर काही पर्यायी स्थानकांवरून धावणार आहेत.

ब्लॉकदरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ चा काही भाग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. तसेच काही प्लॅटफॉर्मवरून सीएसएमटीच्या दिशेने रेल्वेची वाहतूकही उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन आधीच करून ठेवण्याचे आवाहन केले आहे.

या दिवशी पुणे-तळेगाव, तळेगाव-पुणे, पुणे-दौंड, सातारा-पुणे डेमू तसेच पुणे-सीएसएमटी मुंबई आणि सीएसएमटी मुंबई-पुणे एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. लोणावळा-पुणे आणि तळेगाव-पुणे लोकल शिवाजीनगर येथेच थांबतील, तर बारामती-पुणे डेमू दौंड येथे थांबविण्यात येणार आहे.
याशिवाय जयपूर-पुणे, जम्मू तवी-पुणे, अमरावती-पुणे आणि नागपूर-पुणे एक्सप्रेस या गाड्यांचे थांबे बदलण्यात आले आहेत. काही गाड्या खडकी, हडपसर किंवा सातारा स्थानकावरून पुढील प्रवास सुरू करतील. तसेच काही लांब पल्ल्याच्या गाड्या ३० मिनिटांपर्यंत उशिराने धावणार आहेत.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या गाडीचे अद्ययावत वेळापत्रक तपासूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.






