पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आगामी सर्व पूर्व परीक्षा आता पारंपरिक ओएमआर (OMR) उत्तरपत्रिकांऐवजी संगणकाधारित म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. परीक्षा प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याच्या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे.

या नव्या प्रणालीमुळे पूर्व परीक्षा झाल्यानंतर अवघ्या 21 दिवसांत निकाल जाहीर करणे शक्य होणार आहे. यापूर्वी निकाल जाहीर होण्यासाठी बराच वेळ लागत असल्याने उमेदवारांना पुढील टप्प्यांसाठी प्रतीक्षा करावी लागत होती. आता आयोगाने संपूर्ण प्रक्रिया निश्चित वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल 22 दिवसांत जाहीर करून आयोगाने वेगवान कामगिरीचे उदाहरणही दाखवून दिले आहे.

आयोगाने भरती प्रक्रियाही जलद करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या पदांसाठी मुलाखत आवश्यक आहे, त्या पदांची संपूर्ण निवड प्रक्रिया 9 ते 11 महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर केवळ लेखी परीक्षेवर आधारित पदांची भरती 6 ते 7 महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारांचे वेळेचे नुकसान कमी होण्यास मदत होणार आहे.
मुख्य परीक्षेबाबत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राज्यसेवा तसेच गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’च्या मुख्य परीक्षा पूर्वीप्रमाणेच सध्याच्या पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. सीबीटी पद्धत केवळ पूर्व परीक्षांसाठी लागू असेल.
एमपीएससीने यापूर्वीही सुमारे 140 परीक्षा सीबीटी प्रणालीद्वारे यशस्वीपणे घेतल्या आहेत. तसेच एसएससी, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आणि महाराष्ट्र सीईटी सेल यांसारख्या संस्थाही हीच पद्धत वापरत आहेत. त्यामुळे ही प्रणाली विश्वासार्ह आणि पारदर्शक असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी सांगितले की, सीबीटी पद्धतीमुळे परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित, जलद आणि पारदर्शक होईल. तसेच पेपरफुटीसारख्या प्रकारांना आळा बसून उमेदवारांना वेळेत निकाल आणि भरती प्रक्रिया पूर्ण होण्याचा मोठा फायदा मिळेल.






