पुणे: पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. आज झालेल्या या अपघातात एकापाठोपाठ ५ ते ६ वाहनांची जोरदार धडक झाली. या अपघातात एका रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना थोडक्यात टळली.

प्राथमिक माहितीनुसार, नवले पुलाच्या तीव्र उतारावर एका वाहनाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. भरधाव वाहनाने समोरून जाणाऱ्या वाहनांना जोरदार धडक दिली. त्यानंतर एकापाठोपाठ एक अशी ५ ते ६ वाहने एकमेकांवर आदळली. या धडकेत काही वाहनांचे मोठे नुकसान झाले, तर एका रिक्षाची अवस्था अत्यंत खराब झाली आहे.

अपघाताची तीव्रता इतकी होती की, वाहनांच्या धडकेचा मोठा आवाज परिसरात ऐकू आला. घटना घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातामुळे वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांना काही काळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

वाहनांचे झालेले नुकसान आणि अपघाताची तीव्रता पाहता या दुर्घटनेत मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. मात्र, सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप बचावले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. नवले पुलावरील तीव्र उतार आणि वाहनांचा वेग यामुळे यापूर्वीही या परिसरात गंभीर अपघात झाले आहेत. त्यामुळे या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.







