Ajit Pawar Death: पुणे: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Death) यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यविधी आणि धार्मिक कार्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांचा दशक्रिया विधी होणार नसल्याचे त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी स्पष्ट केले आहे. सामान्यतः निधनानंतर 10व्या दिवशी दशक्रिया विधी करण्याची परंपरा असते, परंतु पवार कुटुंबाने हा विधी न करण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीनिवास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्थि विसर्जन ज्या दिवशी करण्यात आले, त्याच वेळी सर्व आवश्यक धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले आहेत. त्यामुळे आता 10 व्या किंवा 13 व्या दिवशी कोणताही स्वतंत्र सार्वजनिक किंवा धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही. अजित पवार यांच्या निधनामुळे सध्या संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या उत्तरकार्याबाबत लोकांमध्ये जी चर्चा होती, ती आता या स्पष्टीकरणामुळे थांबली आहे.

या निर्णयाबाबत कुटुंबातील इतर सदस्य जसे की सुनेत्रा पवार, पार्थ पवार किंवा जय पवार यांच्याकडून अद्याप कोणतेही अधिकृत पत्रक किंवा प्रतिक्रिया आलेली नाही. तरीही श्रीनिवास पवार यांनी कुटुंबाशी चर्चा करूनच ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली असल्याचे समजते.
दुसरीकडे, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा प्रश्नही चर्चेत आला आहे. पक्षाची धुरा आता कोणाकडे जाणार याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. प्रफुल्ल पटेल यांचे नाव चर्चेत आले होते, पण त्यांनी या बातम्यांचे खंडन केले आहे. दुसरीकडे, पक्षातील अनेक आमदार आणि कार्यकर्ते सुनेत्रा पवार यांनी अध्यक्षपद स्वीकारावे अशी मागणी करत आहेत. अशा प्रकारे एकीकडे पक्षाच्या नेतृत्वाचा विषय आणि दुसरीकडे धार्मिक विधी न करण्याचा निर्णय, या दोन्ही गोष्टी सध्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत.






