पिंपरी-चिंचवड : शहरातील वाढत्या चेन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. मकोकासह पाच गुन्ह्यांत पाहिजे असलेल्या सराईत इराणी चेन चोराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ३४ लाख ३३ हजार रुपये किमतीचे २७ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवडमधील १३ आणि पुणे शहरातील दोन, अशा एकूण १५ चेन चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लागला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी शहरातील चेन चोरीचे गुन्हे उघडकीस आणून आरोपींना अटक करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या पथकांना दिले होते. त्यानुसार पोलीस उपायुक्त रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला.

चेन चोरीच्या घटनांनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तब्बल ४०० ते ५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यातून आरोपींचा माग मुंबईपर्यंत काढण्यात आला. या तपासात फिदा इराणी आणि आदित्य मनलोर यांची नावे निष्पन्न झाली.

गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ५ सप्टेंबर रोजी देहूरोड परिसरातून फिदा इराणी याला अटक केली. त्याच्यासोबत मुकेश नेटके यालाही ताब्यात घेण्यात आले. तपासात फिदा इराणीने आदित्य मनलोर आणि काशिम जाफर हुसेन यांच्यासोबत विविध ठिकाणी चेन चोरी केल्याचे समोर आले.
फिदा इराणीविरुद्ध यापूर्वी खुनाचा प्रयत्न आणि चेन चोरीसह गंभीर स्वरूपाचे १० गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुकेश नेटकेविरुद्ध अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. दरम्यान, तालीब बाबा इराणी आणि अली अब्बास शौकत इराणी हे प्रत्येकी पाच चेन चोरीच्या गुन्ह्यांत पाहिजे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. दोघांना ८ सप्टेंबर रोजी ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
आदित्य मनलोर सध्या रावेत पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याचा पुढील तपासासाठी ताबा घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.







