पुणे : पुणे आणि परिसरातील ऐतिहासिक, धार्मिक तसेच निसर्गरम्य पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी आता अवघ्या ५०० रुपयांत वातानुकूलित ई-बसने प्रवास करता येणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) नागरिकांसाठी ही विशेष पर्यटन बससेवा सुरू केली आहे. या उपक्रमांतर्गत १५ पर्यटन मार्ग उपलब्ध करून देण्यात आले असून, कुटुंबीय आणि मित्रपरिवारासोबत कमी खर्चात पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे.

या सुविधेअंतर्गत पर्यटकांना आरामदायी एसी ई-बसने पुणे शहर, जिल्हा आणि आसपासच्या परिसरातील विविध पर्यटनस्थळांना भेट देता येणार आहे. यामध्ये सिंहगड किल्ल्याचा पायथा, खडकवासला धरण, पानशेत, मोरगाव, जेजुरी, नारायणपूर, प्रतिशिर्डी (शिरगाव), देहू येथील गाथा मंदिर, आळंदी, भाटघर धरण, कार्ला लेणी आणि लोणावळ्यातील महालक्ष्मी नारायणी धाम या ठिकाणांचा समावेश आहे.
ही पर्यटन बससेवा शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी उपलब्ध असेल. नोकरदार, आयटी क्षेत्रातील कर्मचारी, विद्यार्थी आणि कुटुंबीयांना सुट्टीच्या दिवशी पर्यटनाचे नियोजन करता येणार आहे.

या प्रवासाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक बसमध्ये पर्यटकांसाठी मार्गदर्शक (गाईड) उपलब्ध असेल. त्यामुळे पर्यटनस्थळांचा इतिहास, धार्मिक महत्त्व आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांची माहितीही प्रवाशांना मिळणार आहे.

पर्यटन बससेवेचे तिकीट पीएमपीएमएलच्या अधिकृत पास केंद्रांवर आरक्षित करता येणार आहे. यासाठी डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक, निगडी आणि मनपा भवन या आठ ठिकाणी आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आरक्षण केलेल्या दिवशी काही कारणास्तव प्रवास करता आला नाही, तर पुढील शनिवार, रविवार किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी प्रवास करण्याची सुविधाही देण्यात आली आहे.
पर्यटनासाठी आरक्षित केलेल्या तिकिटावर घरापासून पर्यटन बसच्या निर्धारित ठिकाणापर्यंत जाण्यासाठी आणि पर्यटन पूर्ण झाल्यानंतर अंतिम ठिकाणापासून घरी परतण्यासाठी पीएमपीएमएलच्या नियमित बससेवेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे प्रवासाच्या सुरुवातीपासून परतीपर्यंत सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध होईल.
एखाद्या गटातील ३३ प्रवाशांनी एकत्रितपणे पर्यटनाचे नियोजन केल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र बस उपलब्ध करून देण्याची सुविधाही पीएमपीएमएलने ठेवली आहे. त्यामुळे कुटुंबीय, मित्रमंडळी, शैक्षणिक संस्था आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांना एकत्रित पर्यटनाचे नियोजन करता येणार आहे.
या पर्यटन बससेवेबाबत अधिक माहिती आणि आरक्षणासाठी नागरिकांनी ०२०-२४५०३२३६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनाने केले आहे.







