उरुळी कांचन, ता. 12 : घरासमोर पार्क केलेली ओला कंपनीची इलेक्ट्रिक दुचाकी अज्ञात व्यक्तीने ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याची घटना दत्तवाडी (बगाडेमळा) येथे घडली. या आगीत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली असून सुमारे 60 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी प्रविण लक्काप्पा मुरगानुर (वय 42, नोकरी- वायरमन, रा. दत्तवाडी, बगाडेमळा, ता. हवेली) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. मुरगानुर यांनी 10 जुलै 2026 रोजी ओळखीचे सौरभ सुदाम साठे यांच्याकडून 65 हजार रुपयांना ओला कंपनीची काळ्या रंगाची इलेक्ट्रिक दुचाकी (एमएच 12 व्हीआर 1171) खरेदी केली होती.
8 नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांनी ही दुचाकी घरासमोरील रस्त्याच्या कडेला पार्क केली होती. त्यानंतर मध्यरात्री सव्वातीनच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणारे विक्रम धुमाळ यांनी फोन करून दुचाकीला आग लागल्याची माहिती दिली. लाल रंगाच्या वॅगनआर कारमधून आलेल्या एका व्यक्तीने दुचाकी पेटवून दिल्याचे त्यांनी पाहिल्याचे सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच मुरगानुर यांनी पत्नी व शेजाऱ्यांच्या मदतीने दुचाकीवर पाणी टाकून आग विझवली. मात्र, तोपर्यंत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली होती. अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक ज्वलनशील पदार्थ टाकून दुचाकी पेटविल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 324(4), 326(फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.








