लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता.हवेली) येथील जगदंबा हॉटेलमध्ये जेवणाच्या बिलावरून झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. हॉटेल मालक, त्यांचा मुलगा आणि ग्राहकाला मारहाण केल्याप्रकरणी माजी सरपंच राहुल काळभोर यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर, आता माजी सरपंचांच्या बाजूनेही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, जेवणानंतर ताटात हात धुतल्याचा तसेच रोख रक्कम न देता ऑनलाइन पेमेंट केल्याचा राग मनात धरून हॉटेल मालकासह सात जणांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप माजी सरपंच राहुल काळभोर यांचे बंधू रामचंद्र काळभोर यांनी केला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी हॉटेल मालकासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी रामचंद्र दत्तात्रय काळभोर (वय, 48, रा. रायवाडी, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजू चौधरी, मयूर चौधरी, दीपक कुकरेजा, ओम चौधरी (सर्व रा. लोणी काळभोर) आणि इतर तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 9 नोव्हेंबर रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास कदमवाकवस्ती येथील जगदंबा हॉटेलमध्ये घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवणाचे बिल ऑनलाइन आले आहे का, यावरून झालेल्या शाब्दिक वादातून हॉटेलमध्ये मारहाणीची घटना घडली होती. या घटनेत हॉटेल मालक, त्यांचा मुलगा आणि एका ग्राहकाला हाताने मारहाण करून जखमी करण्यात आल्याची फिर्याद राजेंद्र चौधरी यांनी दिली होती. त्यानुसार राहुल दत्तात्रय काळभोर, रामचंद्र काळभोर, स्वप्निल काळभोर आणि विकास काळभोर यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, रामचंद्र काळभोर यांनी दिलेल्या फिर्यादीत वेगळी बाजू मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर त्यांनी ताटात हात धुतले आणि जेवणाचे पैसे रोख स्वरूपात न देता ऑनलाइन पेमेंट केले. याचा राग आल्याने हॉटेलमधील संबंधितांनी त्यांच्यासह त्यांचा भाऊ राहुल आणि इतर नातेवाईकांना अरेरावी करीत शिवीगाळ केली. तसेच हाताने मारहाण करून जखमी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
एकाच घटनेत दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्याने जगदंबा हॉटेलमधील वाद चांगलाच चर्चेत आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अशोक नळे करीत आहेत.







