पुणे: धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना नवे वळण मिळाले आहे. शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरू असतानाच त्यांच्या वडिलांच्या हत्याकांडाच्या निकालानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. (Operation Tiger)

शनिवारी मुंबई सत्र न्यायालयाने पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील निकाल जाहीर केला. या प्रकरणात माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या निकालामुळे ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. निकालानंतर त्यांनी पक्षांतराबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नसल्याचे स्पष्ट केले. पुढील दोन दिवसांत मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, शनिवारी रात्री पुण्यात महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली. ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतली. या बैठकीत उशिरापर्यंत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. ओमराजे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे कैलास पाटील यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.
बैठकीनंतर कैलास पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ओमराजे निंबाळकर यांनी अनेक वर्षे न्यायासाठी संघर्ष केला, मात्र त्यांना अपेक्षित निकाल मिळाला नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा संदेश घेऊन आम्ही त्यांच्याकडे आलो होतो. त्यांच्या मनात आजही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदर आणि आपुलकी कायम आहे. ते पक्षातच राहतील, असा विश्वास असल्याचे पाटील यांनी म्हटले.
ओमराजे निंबाळकर यांच्या अंतिम निर्णयाकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. पुढील २४ ते ४८ तासांत ते कोणती भूमिका घेतात, यावर ठाकरे आणि शिंदे गटातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






