पुणे: नसरापूर येथे ३ वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा खटला (Narsapur Case) आता अंतिम टप्प्यात आला असून, विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात यावर सुनावणी सुरू आहे. या खटल्याचा निकाल २५ जून रोजी लागण्याची शक्यता आहे. (Pune Crime)

अंतिम युक्तिवादादरम्यान विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी ६ सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत गुन्ह्याचा घटनाक्रम मांडला. दुपारी 3:12 वाजता आरोपी भीमराव कांबळे पीडितेला घेऊन जाताना आणि दुपारी 3:51 वाजता तो एकटाच परतताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. यावरून ती चिमुकली तब्बल 39 मिनिटे आरोपीच्या ताब्यात असल्याचे सिद्ध झाले आहे. या काळात त्याने पीडितेवर पाशवी अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. ॲड. मिसर यांनी न्यायालयात सादर केलेल्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक बाब समोर आली की, चिमुकलीचा मृत्यू झाल्यानंतरही आरोपीने तिच्या मृतदेहावर अत्याचार केले.

आरोपीने स्वतःच्या बचावासाठी ‘पाय घसरून पडल्या’ची जी खोटी कथा रचली होती, ती सरकारी वकिलांनी वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे फेटाळून लावली. या खटल्यात डीएनए (DNA) प्रोफाइलिंग हा सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरला आहे. पीडितेच्या शरीरावर आढळलेले आरोपीचे केस, त्याचे चावे आणि पीडितेच्या तोंडात कोंबलेल्या कपड्यावर आरोपीचा डीएनए मॅच झाला आहे. आरोपीने गुन्हा करण्यापूर्वी घटनास्थळाची रेकी केली होती आणि पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला होता, असेही न्यायालयात स्पष्ट झाले.
तपास यंत्रणेने अत्यंत तत्परतेने काम करत अवघ्या 16 दिवसांत दोषारोपपत्र दाखल केले आणि त्यानंतर पुढील 16 दिवसांत 55 साक्षीदारांची साक्ष पूर्ण करून घेतली. सरकारी वकील अजय मिसर आणि त्यांचे सहकारी ॲड. प्रथमेश शिंगणे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा दाखला देत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली आहे. आता संपूर्ण राज्याचे लक्ष २५ जूनला येणाऱ्या निकालाकडे लागले आहे.






