पुणे: दिवाळी सणासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पुणे एसटी विभागाने यंदा सुमारे ९०० जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. प्रवाशांकडून या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ३०० जादा बसचे आरक्षण पूर्ण झाले आहे. काही बसचे आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक झाले असून, मराठवाडा, विदर्भ आणि खान्देश मार्गांवर सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे.

नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि अन्य कारणांमुळे राज्याच्या विविध भागांतील नागरिक पुणे आणि परिसरात वास्तव्यास आहेत. दिवाळीच्या सुट्टीत कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्यासाठी अनेकजण मूळ गावी जाण्याचे नियोजन करतात. त्यामुळे दरवर्षी दिवाळीच्या काळात एसटी बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होते. ही गर्दी लक्षात घेऊन पुणे एसटी विभागाने नियमित ३०० बससह ९०० जादा बसची व्यवस्था केली आहे.
प्रवासाचे नियोजन आधीच करणाऱ्या नागरिकांकडून एसटीच्या आगाऊ आरक्षणाला पसंती दिली जात आहे. त्यामुळे ऐनवेळी तिकीट काढण्यासाठी होणारी धावपळ आणि गर्दी टाळता येणार आहे. मात्र, आरक्षण न केलेल्या प्रवाशांनाही उपलब्ध जागांनुसार ऐनवेळी तिकीट काढून प्रवास करता येणार आहे.

पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर आगारातूनही दिवाळीनिमित्त जादा बस सोडण्यात येणार आहेत. महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत, तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध असल्याने एसटी प्रवासाकडे प्रवाशांचा कल वाढत आहे.
प्रवाशांची गर्दी विभागण्यासाठी पुण्यातील विविध बसस्थानकांवरून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यानुसार शिवाजीनगर येथून १३६, स्वारगेट येथून २३५, तर पिंपरी-चिंचवड येथून ४५५ जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दिवाळीच्या काळात प्रवाशांनी शक्यतो आगाऊ आरक्षण करून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांनी केले आहे.







