पुणे: पुण्यात सायबर भामट्यांनी नागरिकांची फसवणूक करण्यासाठी मतदार यादी दुरुस्तीच्या नावाचा नवा फंडा वापरल्याचे समोर आले आहे. कर्वेनगर परिसरातील एका निवृत्त ज्येष्ठ नागरिकाला एसआयआर फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी तब्बल ४ लाख ४३ हजार रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ३० जुलै रोजी घडली. कर्वेनगरमधील नवसह्याद्री सोसायटीत राहणाऱ्या निवृत्त नागरिकाला मोबाईलवर एक मेसेज आला. त्यामध्ये मतदार यादी दुरुस्तीचे काम सुरू असून, त्यांनी भरलेल्या एसआयआर फॉर्ममध्ये काही चूक असल्याचे सांगण्यात आले. चूक दुरुस्त करण्यासाठी सोशल मीडियावर एक फॉर्म पाठवून त्यासाठी केवळ पाच रुपये भरावे लागतील, असे भामट्यांनी सांगितले.

पाच रुपये भरण्यासाठी ज्येष्ठ नागरिक तयार झाल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर एक APK फाइल पाठवण्यात आली. या फाइलमध्ये बँक खात्याची माहिती भरण्यास सांगण्यात आले. त्यांनी विश्वास ठेवून आवश्यक माहिती भरताच सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलचा ताबा मिळवल्याचा आरोप आहे.

यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून ४ लाख ४३ हजार रुपये दुसऱ्या खात्यात वर्ग करण्यात आले. बँकेकडून पैसे वजा झाल्याचे संदेश आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने अलंकार पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ज्या खात्यात पैसे वर्ग करण्यात आले, त्याची तांत्रिक माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, मतदार यादी दुरुस्ती, एसआयआर फॉर्म किंवा कोणत्याही शासकीय कामाच्या नावाने मोबाईलवर आलेल्या अनोळखी लिंकवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अनोळखी व्यक्तीने पाठवलेली APK फाइल मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू नये. तसेच बँक खात्याची माहिती, ओटीपी किंवा पिन कोणाशीही शेअर करू नये. फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.







