पुणे : राज्यात सध्या सुमारे ३० हजार शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेत आता महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. शिक्षक भरती अधिक पारदर्शक आणि वेगाने पूर्ण करण्यासाठी ‘पवित्र’ पोर्टलमध्ये काही नवे नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवारांना प्राधान्यक्रम निवडताना आणि अर्ज भरताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. दुसरीकडे, मुलाखतीच्या माध्यमातून होणाऱ्या भरतीतील संस्थाचालकांच्या मनमानीला आळा बसण्याची शक्यता आहे.

मुलाखतीशिवाय होणाऱ्या पहिल्या फेरीसाठी १:१, तर मुलाखतीसह होणाऱ्या भरतीसाठी १:३ असे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. म्हणजेच मुलाखतीशिवाय प्रक्रियेत प्रत्येक पदासाठी एका उमेदवाराची निवड केली जाणार आहे. तर मुलाखतीसह प्रक्रियेत एका पदासाठी केवळ तीन उमेदवारांना मुलाखतीसाठी संधी दिली जाणार आहे.

निवड झाल्यानंतर पुन्हा त्याच गुणांवर संधी नाही
नव्या नियमांमधील महत्त्वाचा बदल म्हणजे प्राधान्यक्रमाच्या आधारे एखाद्या पदावर उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्याच चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे त्याला दुसऱ्या पदासाठी पुन्हा संधी मिळणार नाही. त्याला पुन्हा शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी व्हायचे असल्यास नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागेल. त्यामुळे उमेदवारांनी उपलब्ध पदांचा प्राधान्यक्रम निश्चित करताना विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे.

१०० पदांना प्राधान्यक्रम देता येणार
उमेदवारांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार ‘पवित्र’ पोर्टलवर त्यांच्यासाठी उपलब्ध पदांचे पर्याय दाखवले जाणार आहेत. मुलाखतीशिवाय होणाऱ्या प्रक्रियेत उमेदवारांना जास्तीत जास्त १०० प्राधान्यक्रम निवडता येतील. तर मुलाखतीसह होणाऱ्या प्रक्रियेत जास्तीत जास्त ५० प्राधान्यक्रम निवडण्याची मुभा असेल.
स्व-प्रमाणपत्रातील माहितीच्या आधारे भरतीची प्रक्रिया राबवली जाणार असल्याने अर्जामध्ये चुकीची माहिती भरल्यास उमेदवाराला त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे पात्रता, विषय, इयत्ता, आरक्षण आणि उपलब्ध पदांची माहिती काळजीपूर्वक तपासल्यानंतरच प्राधान्यक्रम लॉक करणे आवश्यक आहे.
संस्थाचालकांचीही धाकधूक वाढली
मुलाखतीसह होणाऱ्या प्रक्रियेत १:३ प्रमाण निश्चित केल्याने प्रत्येक पदासाठी केवळ तीन उमेदवार मुलाखतीसाठी उपलब्ध होतील. त्यामुळे संस्थांना उपलब्ध उमेदवारांमधूनच निवड करावी लागणार आहे. तसेच मुलाखतीशिवाय होणाऱ्या प्रक्रियेत १:१ प्रमाण असल्याने गुणवत्तेच्या आधारे थेट नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
TAIT पात्रतेच्या तारखाही निश्चित
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अर्थात TAIT साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता १४ मेपर्यंत पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. तर व्यावसायिक अर्हता २५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण केलेली असणे बंधनकारक आहे.
जाहिरातीतील आरक्षण, इयत्तानिहाय गट आणि विषयानुसार उपलब्ध रिक्त पदांची माहिती उमेदवारांच्या लॉगिनवर दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी आपल्या पात्रतेनुसार उपलब्ध पर्याय तपासूनच प्राधान्यक्रम निश्चित करणे महत्त्वाचे ठरणार आहे.







