पुणे: पुण्यात ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली एका ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अधिकारी असल्याचे भासवत सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला भीती दाखवली आणि काही तासांतच त्यांच्या बँक खात्यातील आयुष्यभराची पुंजी लंपास केली.

मिळालेल्या माहितीनुसार, बंडगार्डन रोड परिसरातील एका सोसायटीत राहणाऱ्या ७२ वर्षीय व्यक्तीला मुंबईहून असल्याचा दावा करणारा फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अधिकारी असल्याचे सांगितले.

सायबर भामट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला सांगितले की, त्यांच्या नावाने एक बनावट बँक खाते उघडण्यात आले असून त्या खात्याचा वापर काळ्या पैशांच्या व्यवहारासाठी करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो, असे सांगून त्यांना घाबरवण्यात आले.

यानंतर आरोपींनी ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत, “अटक टाळायची असेल तर चौकशी आणि पडताळणीसाठी आम्ही सांगत असलेल्या खात्यात तात्काळ पैसे जमा करा,” असा दबाव टाकला.
पोलिसांच्या नावाने सुरू असलेल्या या बनावट कारवाईला खरे समजून ज्येष्ठ नागरिकांनी कोणतीही खातरजमा न करता आरोपींनी दिलेल्या बँक खात्यावर तब्बल २१ लाख रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. पैसे पाठवल्यानंतर काही वेळाने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
यानंतर त्यांनी तातडीने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सायबर फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तांत्रिक तपास सुरू केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही पोलीस अधिकारी किंवा सरकारी यंत्रणा फोनवरून पैसे भरण्याचे आदेश देत नाही. अशा प्रकारचे फोन आल्यास घाबरून कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत आणि तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा सायबर हेल्पलाइनशी संपर्क साधावा.







