पुणे : मोशी येथील ‘वेस्ट टू एनर्जी’ कचरा डेपोत घडलेल्या भीषण दुर्घटनेत एका निष्पाप कामगाराचा बळी गेला आहे.अक्षय राजू सावंत असं त्याच नावं आहे. अवघ्या 2 महिन्यापूर्वीच अक्षयचा विवाह मुंबईच्या हर्षदा यांच्याशी झाला होता. हातातील हिरव्या बांगड्यांचा रंगही अजून जसाच्या तसाच होता. गरिबीच्या परिस्थितीतही कष्ट करून सुखी संसार उभा करण्याचे स्वप्न या जोडप्याने पाहिले होते. मात्र, विवाहाचे केवळ 2 महिने पूर्ण होत नाहीत तोच नियतीने त्यांच्या सुखावर घाला घातला.

मोशीतील प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा प्रचंड ढीग कोसळल्याने 33 वर्षीय वाहनचालक अक्षय राजू सावंत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुमारे 83 तासांच्या अथक शोधमोहिमेनंतर अक्षय यांचा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण भोसरी परिसरात शोककळा पसरली आहे.

अक्षय सावंत हे मोशीतील लक्ष्मीनगर भागात आपल्या कुटुंबासह राहत होते. अत्यंत कष्टाळू आणि मनमिळाऊ स्वभाव असलेल्या अक्षय यांनी दुर्घटनेच्या अवघ्या 1 महिन्यापूर्वीच या प्रकल्पात कामाला सुरुवात केली होती. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, भाऊ आणि पत्नी असा परिवार आहे. अक्षय यांच्या अकाली जाण्याने वृद्ध आई-वडिलांच्या म्हातारपणाचा मुख्य आधार हिरावला गेला असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या संपूर्ण घटनेत सर्वात मोठा आघात अक्षय यांच्या पत्नी हर्षदा यांच्यावर झाला आहे. अवघ्या 2 महिन्यांपूर्वी, म्हणजेच 25 एप्रिल रोजी मुंबईच्या हर्षदा यांच्याशी अक्षय यांचा विवाह झाला होता. विवाहाचे केवळ २ महिने पूर्ण होत नाहीत तोच नियतीने त्यांच्या सुखावर घाला घातला.
8 जुलै रोजी नेहमीप्रमाणे अक्षय कामावर गेले होते, पण दुपारी घडलेल्या या अनपेक्षित अपघाताने त्यांचे हसतेखेळते आयुष्य संपवले. ज्या डोळ्यांमध्ये काही दिवसांपूर्वी नव्या संसाराची सुंदर स्वप्ने होती, आज तिथे अश्रूंचा महापूर आला आहे. हर्षदा यांचा काळजाचा थरकाप उडवणारा आक्रोश पाहून उपस्थित प्रत्येक नागरिकाचे डोळे पाणावले.
एका निष्पाप कामगाराच्या मृत्यूमुळे एका नववधूचे संपूर्ण आयुष्य आता अंधारात ढकलले गेले असून, या बेजबाबदार प्रशासकीय दुर्घटनेबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व दुःख व्यक्त होत आहे.







