पुणे : कात्रज परिसरात जुन्या वादातून १७ वर्षीय तरुणाची कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मृत तरुणाचे नाव गणेश रवींद्र माळवे (वय १७, रा. कात्रज गाव) असे आहे. ही घटना सोमवारी रात्री सुमारे १० वाजता कात्रज तलावाजवळील कात्रज कट्टा येथे घडली. याप्रकरणी गणेश रामदास चव्हाण (वय २२, रा. गुजर वस्ती, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांपूर्वी गणेश माळवे याचा एका आरोपीच्या बहिणीशी वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून आरोपीने गणेशला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
घटनेच्या दिवशी गणेश माळवे हा मित्रासोबत मोबाईल दुरुस्त करून घेण्यासाठी कात्रज कट्टा परिसरातील दुकानात गेला होता. मोबाईल घेऊन बाहेर पडत असताना दोन ते तीन दुचाकींवरून आलेल्या आरोपींनी त्याला घेरले. आरोपींकडे कोयते व लोखंडी हत्यारे होती. गणेशने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी त्याचा पाठलाग करून डोके, चेहरा आणि हातावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या गणेशला भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी बहुतेक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी तिघांची भरपावसात पोलिसांनी घटनास्थळ परिसरात धिंड काढली. आरोपींना पाहण्यासाठी आणि त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी मृताच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी करत संताप व्यक्त केला







