पुणे : भारतील जनता पक्षाच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोधाकडे दुर्लक्ष करून केंद्र पातळीवर काम करणाऱ्या एका नेत्याने भाजपमध्ये शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या माजी नगरसेवकांचा प्रवेश घडवून आणला आहे. यामुळे ही नाराजी पसरली आहे. पक्षात इच्छुकांची रांग लागलेली असताना दुसऱ्या पक्षातील नेत्यांना पक्षात प्रवेश देत महापालिकेचा शब्द का दिला जात असल्याची चर्चा होत आहे.
पक्ष वाढीसाठी गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांकडे आणि पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करून राज्यात आणि केंद्रात वजन वाढविण्यासाठी हे पक्ष प्रवेश करून घेण्यात येत असल्याच्या चर्चा शहरात होऊ लागल्या आहेत. नुकत्याच झालेल्या पाच माजी नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशामुळे नाराज झालेल्या भाजपच्या मध्यवर्ती भागातील पदाधिकाऱ्याने फ्लेक्स लावून शेरो शायरीच्या माध्यमातून मनातील खदखद बाहेर काढली आहे. ‘दुश्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएं तो शर्मिंदा न हों’ अशा आशयाचे हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या सोमवार पेठ, मंगळवार पेठ तसेच कँन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील रास्ता पेठ परिसरात हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. भाजपचे महापालिकेतील माजी सभागृह नेते गणेश बीडकर यांचे सहकारी असलेले विशाल दरेकर यांचे नाव या फ्लेक्सच्या खाली आहे. यावर पक्ष प्रवेशाबाबत स्पष्टपणे लिहिण्यात आले नसले तरी, यामुळे शहर भाजपमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत गटबाजी उफाळून येण्याची चिन्ह दिसू लागली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे शहरातील स्थानिक पदाधिकारी आणि राज्यात आणि केंद्रात नेत्यांमधील संघर्ष वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्या कार्यकर्त्यांनी झाड जपले, त्यांच्यावर महापालिका निवडणुकीला फळ चाखण्याची वेळ आली. तेव्हा इतर पक्षातील लोकांना संधी देण्यात येत असल्याची खंत भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून बोलली जात आहे.