पुणे : पुणे शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ (वय ५७) यांचे सोमवारी निधन झाले. १५ जानेवारी रोजी ते पाय घसरून तिसऱ्या मजल्यावरून खाली पडले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे. या घटनेने शहर पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
अशोक धुमाळ हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र होते. पोलीस दलात भरती झाल्यानंतर त्यांनी राज्यातील विविध शहरांमध्ये काम केले होते. गेल्यावर्षी त्यांची पुणे शहर सहायक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. धुमाळ भारती विद्यापीठ भागातील आंबेगाव बुद्रुक परिसरात राहायला होते. सदनिकेतील गॅलरीतून ते १४ जानेवारी रोजी पाय घसरून पडले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्या पायाला आणि बरगड्यांना फ्रॅक्चर झाले होते. त्यांच्यावर भारती विद्यापीठ रुग्णालयात उपचार सुरू होते. शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना साध्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले होते.
दरम्यान, प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तीन दिवसांपूर्वी रूबी हॉल क्लिनिकमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास धुमाळ यांनी अखेरचा श्वास घेतला.