पुणे, : कल्याण – नगर महामार्गावरील डिंगोरे हद्दीत असलेल्या कठेश्वरी पुलालगत भरधाव येणाऱ्या कारने परप्रांतीय पाच मजुरांना चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोघांचा जागेवरच मृत्यू झाला असून एकाचा उपाचरा दरम्यान मृत्यू झाला आहे. हि घटना रविवारी (ता. २४) रात्री घडली आहे. जखमींवर आळेफाटा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जगदीश महेंद्रसिंग डावर, सुरमल मांजरे, दिनेश तारोले अशी मृत झालेल्या तिघांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वीच एका शेतकऱ्याच्या शेतावर शेतमजूर म्हणून ते कामाला आले होते.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर – कल्याण महामार्गावर दोन ते तीन दिवसांपूर्वीच डीगोरे परिसरात पाच शेत मजूर मध्यप्रदेश येथून आले होते. मात्र रविवारी संध्याकाळी शेतातील कामे उरकून पायी घरी जात असताना महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव चारचाकीने वेगात धडक दिली.
दरम्यान, या अपघातात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एकाला दवाखान्यात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुढील कारवाई करत अपघातस्थळी पंचनामा केला. प्रशासनाने गावागावालगत गतिरोधक बसवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.