Pune News : पुणे : पुणे-नगर रस्त्यावर ज्वलनशील वायू घेऊन जाणारा मोठा टँकर पलटी झाला. या अपघातामुळे टँकरमधून मोठी गॅस गळती झाली होती. वडगाव शेरी फाटा येथे ही घटना घडली. या अपघातामुळे टँकर मधून गॅस गळती सुरू झाली आहे. टँकरमधला वायु सामान्य नव्हता. त्यामुळे मोठा स्फोट होण्याची शक्यता होती. मात्र सुदैवाने असंकाही धडलं नाही. सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळ वाहतूक पोलिसांनी मध्यरात्रीपासून वाहतूक बंद केली होती. ती नगर रस्त्याच्या एका बाजूने वळवली आहे.
टँकरमधून सुरू असलेली वायू गळती थांबवण्याकरता सदर कंपनीचे सुरक्षा पथक उपाययोजना करण्यासाठी मुंबईवरून आले आहे. तोपर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि हवेमध्ये वायू मिसळू नये याकरता सतत टँकरवर पाण्याचे फवारे मारण्याचे काम सुरू आहे.
सुरक्षेचा प्राथमिक उपाय म्हणून वायुगळती होत असलेल्या टँकरवर सुमारे दहा अग्निशामक दलाच्या गाड्यांतून पाण्याचे फवारे मारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते. टँकरवर सतत पाणी मारावे लागत असल्यामुळे वडगाव शेरी पंपिंग स्टेशन शेजारील दोन पंचतारांकित हॉटेलच्या पाण्याच्या टाक्यांमधून पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र, अद्याप तरी अपघाताचे नेमके कारण कळू शकले नाही.
इथलीन ऑक्साईड हा ज्वलनशील वायू टँकर घेऊन जात होता. वडगाव शेरी फाट्यावरील ईबीज हॉटेल समोरील दुभाजकाला धडकून तो पलटी झाला. टँकर चालकाची प्रकृती बरी नसल्यामुळे त्याचे टँकरवरील नियंत्रण सुटले असावे असा अंदाज आहे. टँकर चालकाला रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे.