पुणे : शासनाकडून ट्रॅक्टरचे मंजूर झालेले अनुदान देण्यासाठी 4 हजाराची लाच स्वीकारताना कृषी पर्यवेक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जुन्नर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आज गुरुवारी (ता. ६) रंगेहाथ पकडले आहे. बापु एकनाथ रोकडे (वय ५७, पद -कृषी पर्यवेक्षक, नेमणुक तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जुन्नर, जि. पुणे, वर्ग-३) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ५२ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना लॉटरी पद्धतीने शासकीय अनुदानामध्ये ट्रॅक्टर मंजूर झाला होता. सदरचे शासकीय अनुदान मंजूर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता तक्रारदार यांनी केली होती. ट्रॅक्टरचे मंजूर अनुदान मिळण्यासाठी तक्रारदार हे तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जुन्नर येथील कृषी अधिकारी लोकसेवक बापू रोकडे यांना भेटले. त्यानंतर लोकसेवक बापू रोकडे यांनी तक्रादार यांच्याकडे ट्रॅक्टरचे अनुदान मंजूर करण्यासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, लोकसवेक बापु रोकडे यांनी तक्रारदार यांच्याकडे ट्रॅक्टरची शासकीय अनुदानाची रक्कम मंजूर करण्यासाठी तडजोडीअंती ४ हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले होते. त्यानुसार तक्रारदार यांच्य्याकडून 4 हजार रुपयांची लाच स्वीकारताना बापु रोकडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
दरम्यान, याप्रकरणी आरोपी बापू रोकडे याला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करीत आहेत.