Pune : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील टाकळी भिमा येथील शेतकरी कुटुंबातील ऋतुजा किसन वडघुले हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. पहिल्याच प्रयत्नात तिने ओबीसी महिला प्रवर्गातून राज्यात 1 क्रमांक मिळवला आहे.
या परीक्षेत तिची एकाच वेळी 3 पदांसाठी निवड झाली असून त्यामध्ये कर सहाय्यक, महसूल सहाय्यक आणि बेलीफ या पदांचा समावेश आहे. यापैकी तिने कर सहाय्यक पद स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

ऋतुजाचे शालेय शिक्षण टाकळी भिमा आणि निमगाव म्हाळुंगी येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये झाले. त्यानंतर तिने तळेगाव ढमढेरे येथील महाविद्यालयातून इंग्रजी विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले. पदवीचे शिक्षण घेत असतानाच तिने स्पर्धा परीक्षेची तयारी केली.
विशेष म्हणजे, तिने कोणत्याही मार्गदर्शन वर्गाचा आधार न घेता स्वतःच्या अभ्यासाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.
तिच्या या यशाबद्दल गावात तिचा नागरी सत्कार करण्यात आला. या कामगिरीमुळे वडघुले कुटुंब आणि टाकळी भिमा गावाचे नाव राज्यभर चर्चेत आले आहे.







