Junnar News पुणे, ता. ६ : पिंपळवंडी भटकळवाडी (ता. जुन्नर) येथे सामाईक रस्ता आणि घराच्या पडवीच्या हक्काच्या वादातून सख्ख्या भावांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या वादात मोठ्या भावाच्या डोक्यात दगड मारण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. Junnar News

जालिंदर बबन लेंडे (वय ५७) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी (दि. २ मे) दुपारी अडीचच्या सुमारास जालिंदर लेंडे आणि त्यांचे भाऊ नवनाथ व विष्णू लेंडे यांच्यात सामाईक रस्ता सोडण्यावरून वाद सुरू झाला. काही वेळातच हा वाद उग्र स्वरूप धारण करत थेट हाणामारीत परिवर्तित झाला.

आरोपींनी जालिंदर लेंडे यांच्या घरात घुसून त्यांना बेदम मारहाण केली. यावेळी नवनाथ लेंडे यांनी जवळच असलेल्या दगडाने जालिंदर यांच्या डोक्यात वार केला, तर विष्णू लेंडे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेत जालिंदर लेंडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या तक्रारीवरून आळेफाटा पोलिसांनी नवनाथ बबन लेंडे आणि विष्णू बबन लेंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार पंकज पारखे करत असून, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.







