पुणे: राज्यातील सर्व वीजग्राहकांच्या घरांमधील पारंपरिक वीजमीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेला महावितरणने वेग दिला आहे. या उपक्रमाअंतर्गत ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत व्हॉट्सअॅप क्रमांकावर अधिकृत संदेश पाठवून मीटर बदलण्याची पूर्वसूचना दिली जात आहे. संबंधित संदेश मिळाल्यानंतर 48 तासांच्या आत ग्राहकांच्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.

वीजवापराची अचूक आणि तत्काळ माहिती ग्राहकांना उपलब्ध व्हावी, यासाठी स्मार्ट मीटर बसविण्याचे काम राज्यभर सुरू आहे. सध्या राज्यातील 1 कोटी 14 लाखांहून अधिक ग्राहकांकडे स्मार्ट मीटर कार्यान्वित झाले आहेत. पुणे परिमंडळात एकूण 39 लाख ग्राहक असून त्यापैकी 14 लाख ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. उर्वरित 25 लाख ग्राहकांकडे टप्प्याटप्प्याने स्मार्ट मीटर जोडण्याचे काम सुरू आहे.

या मोहिमेला गती देण्यासाठी केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली असून ग्राहकांना पूर्वकल्पना देण्यावर भर दिला जात आहे. केंद्र सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत (RDSS) हा प्रकल्प राबविला जात आहे. स्मार्ट मीटरिंगमुळे वीज वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण होणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ग्राहकांनी महावितरणच्या अधिकृत कर्मचाऱ्यांना आणि प्रतिनिधींना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वीजबिलांच्या अचूकतेबाबत ग्राहकांकडून वारंवार तक्रारी केल्या जातात. अनेकदा वाढीव बिलांवरून ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादही निर्माण होतात. मात्र स्मार्ट प्रीपेड मीटर प्रणालीमुळे अशा समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होण्याची अपेक्षा आहे.
स्मार्ट मीटरमुळे वीजबिल प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमी होईल आणि ग्राहकांचा वेळ वाचेल. मोबाईल अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना स्वतःच्या वीजवापरावर लक्ष ठेवता येईल तसेच त्याचे नियोजन करता येणार आहे. स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना दिवसा वापरल्या जाणाऱ्या विजेवर प्रतियुनिट 80 पैशांची सवलत मिळणार आहे. याशिवाय वीजसेवा आणि बिलांशी संबंधित तक्रारींचे जलद निराकरण होण्यास मदत होईल. तसेच वीजचोरी आणि मीटरमध्ये होणाऱ्या फेरफारांवरही प्रभावी नियंत्रण मिळविता येणार आहे.







