संतोष पवार
पुणे : शासनाने काढलेल्या कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी आणि शासन दरबारी प्रलंबित असणाऱ्या आपल्या विविध प्रश्न – मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांनी पुण्यात भव्य अशा आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. पुणे परिषदेपासून ते जिल्हा आधिकारी कार्यालयापर्यंत पायी चालत काढलेल्या या शिक्षक आक्रोश मोर्चात हजारोंच्या संख्येने शिक्षक कर्मचारी सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक केंद्रप्रमुख सभा, शिक्षक संघ, शिक्षक समिती शिक्षक जुनी पेन्शन हक्क संघटना आणि इतर सर्व शिक्षक संघटनाच्या वतीने एकत्रित मिळून यावेळी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने 5 सप्टेंबर रोजी काढलेला कंत्राटी शिक्षक भरती जी आर, तसेच नवीन शिक्षक संचमान्यता शासन निर्णय,शिक्षकांना दिली जाणारी ऑनलाईन कामे, निवडणूकीच्या नावाखाली वर्षभर BLO म्हणून करावी लागणारी कामे यामुळे शिक्षक व विद्यार्थी शाळेत असूनही त्यांची भेट होत नाही. या आणि अशा विविध अशैक्षणिक कामातून सुटका व्हावी, आपल्या प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्यात याकरिता प्रथमतःच सर्व शिक्षक एक दिवस हक्काची किरकोळ रजा घेऊन सर्व पुणे जिल्ह्यातील शाळा बंद ठेऊन ‘आम्हाला शिकवू द्या’ या एकमेव मागणीसाठी आक्रोश करित रस्त्यावर उतरून मोर्चात सहभागी झाले होते. या सर्व मागण्यांचे निवेदन पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना दिले.
यावेळी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नेते उदयजी शिंदे, कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर, महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेचे राज्याध्यक्ष अनिलजी पलांडे, पुणे जिल्हा अध्यक्ष विनोद चव्हाण, शांताराम नेहरे, नारायण कांबळे,बाळासाहेब मारणे, सुनिल वाघ, शिवाजी वाळके, खंडेराव ढोबळे, राजेंद्र जगताप, संदिप कदम, विकास शेलार, अप्पासाहेब कुल, मिलिंद देडगे, सचिव सूरज कांबळे, सुहास मोरे, अमोल लोंढे, दत्तात्रय शिनगारे,राहूल गायकवाड, चंद्रकांत सलोदे यासह पुणे जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शिक्षकबांधव मोर्चात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा आल्यानंतर सांगता सभा झाली.