पुणे : प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९४१ रोजी झाला. मूळचे लातूरचे इंजिनिअर शिक्षण असलेले डॉ. विश्वनाथ कराड हे पुण्यातील ख्यातनाम सरकारी इंजिनियरिंग कॉलेज सीओईपी कॉलेजमध्ये एक लोकप्रिय प्राध्यापक होते. पुढे त्यांनी डॉक्टरेटही मिळवली. या दरम्यानच्या काळातील अनुभवावरून स्वतःची एक आदर्श शैक्षणिक संस्था काढण्याचा विचार त्यांच्या मनात आला. स्वामी विवेकानंद आणि संत परंपरेतून पुढे आलेले विचार विद्यार्थ्यांमध्ये पोहोचविण्यासाठी त्यांनी एमआयटी ही संस्था सुरू केली.
महाराष्ट्रातील पहिल्या काही खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी एक असलेल्या या संस्थेची स्थापना १९८३ मध्ये डॉ. विश्वनाथ कराड यांनी केली. ही त्यांची संस्था पुण्यात खासगी शिक्षण उपलब्ध करुन देत असून, विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांनी केलेले कार्य समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाचे आहे. पुणे शहराला एज्युकेशन, आयटी हब अशी ओळख देण्यात एमआयटीचा महत्त्वाचा वाटा आहे. पुण्यात एमआयटीमार्फत सर्व क्षेत्रांचे शिक्षण देणाऱ्या संस्था प्रा. कराड यांनी सुरु केल्या.
स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, सक्षम अशी युवा पिढी तयार करण्यासाठी अभियंता झाल्यानंतर त्यांनी अध्यापनाचे क्षेत्र निवडले. त्या माध्यमातूनच पुढे महाराष्ट्रत व्यावसायिक शिक्षणाच्या विस्तारासाठी जनजागृती केली आणि एमआयटी या नामांकित शिक्षण संस्थेची निर्मिती करून नावलौकिक मिळवली. ३ एप्रिल २०१७ रोजी लोणी काळभोर, पुणे येथे माईर्स विश्वराज हॉस्पिटलची स्थापना केली. त्या स्थापनेमागील एकमेव उद्धिष्ट आणि ध्येय म्हणजे रुग्णांकडे वैयक्तिक लक्ष पुरवून त्यांना अतिशय किफायतशीर दरात सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा प्रदान करणं हे होय.
जगातील सर्वात मोठ्या तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर विश्वशांती प्रार्थना घुमट व ग्रंथालयाची संकल्पना पूर्ण करून त्याचे २ ऑक्टोबर २०१८ रोजी लोकार्पण केले. अतिशय उत्तुंग व दैदिप्यमान अशी ही भव्य वास्तू म्हणजे भारतीय संस्कृती, तत्वज्ञान व मानवी जीवनमूल्ये यांचे मूर्तिमंत प्रतिक आहे. त्यांनी खऱ्या अर्थाने भारतीय अस्मिता जागवण्याचे कार्य केलेले आहे. भविष्यात जागतिक किर्तीचा हा घुमट मानवी कल्याणाच्या कार्यासाठी असंख्य युवकांना प्रेरित करेल, आपल्या ज्ञानयोगी, भक्तीयोगी आणि कर्मयोगी अशा व्यक्तिमत्वास वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
आदरणीय प्रा. डॉ. विश्वनाथ कराड सर संस्थापक एमआयटी शिक्षण संस्था, पुणे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! ३ फेब्रुवारी २०२४