अरुण भोई
दौंड : ‘आम्ही पोलीस स्टाफ आहोत, आम्हाला तुमची झडती घ्यायची आहे’ अशी बतावणी करून परप्रांतीय नागरिकांना लुटणाऱ्या दोघांना दौंड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अक्षय अशोक देवकर (रा. वडारगल्ली, दौंड) व युवराज पांडुरंग बनकर (रा. पानसरेवस्ती, दौंड) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत मुनहेन्द्रसिंग कोमलसिंग नरवारिया (रा. शिरूर, पुणे) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
दौंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. ३) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मुनहेन्द्रसिंग कोमलसिंग नरवारिया व आणखी त्याचा साथीदार हे दौंड रेल्वे स्थानकातून बस स्थानकाकडे जात असताना दोन व्यक्तींनी मोटारसायकलवरून येऊन त्यांना अडवले. पोलीस असल्याचे सांगून, त्यांची झडती घेतली. त्यांच्याजवळचा एक मोबाईल व रोकड असा १८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने काढून घेतला. त्यानंतर ‘पोलिसांना कळवल्यास जीवे मारू’ अशी धमकी देत मारहाण केली.
याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीनंतर दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना तत्काळ कारवाईच्या सूचना दिल्या. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून ६ फेब्रुवारी रोजी दौंड शहरातून पानसरे वस्ती व वडार गल्ली येथून दोन व्यक्तींना दौंड पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचे साहित्य जप्त केले आहे.
ही कामगिरी दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक महेश आबनावे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार पोलीस हवालदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, पोलीस नाईक विशाल जावळे, आदेश राऊत, पोलीस कॉन्स्टेबल अमोल देवकाते आदींनी केली आहे.