दीपक खिलारे
इंदापूर : कांदलगाव (ता. इंदापूर) येथील दादासाहेब पाटील विद्यालयामध्ये दोन दिवसीय शालेय विज्ञान प्रदर्शन नुकतेच पार पडले. या प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अॅड. रणजीत बाबर- पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ वैज्ञानिक भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता पाचवी ते सातवीच्या लहान गटातून ४२ प्रकल्प तर इयत्ता आठवी ते दहावीच्या मोठ्या गटातून ४१ प्रकल्प अशा एकूण ८३ प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून टिकाऊ, हवेची गुणवत्ता सुधारणे, लेझर लाईट सिक्युरिटी, सूक्ष्म सिंचन, चांद्रयान मोहीम, सौर ऊर्जा अशा विविध विषयांवर प्रकल्प सादर केले.
या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष बाबुराव ननवरे, सचिव पांडुरंग काशीद, मुख्याध्यापक राम जमदाडे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी ग्रामस्थ व परिसरातील शाळेतील विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. प्रदर्शनाचे नियोजन विज्ञान शिक्षक तनपुरे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले होते.