-पोपट पाचंगे
कारेगाव : शिरुर विधानसभा मतदारसंघाची विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून, निवडणूक काळामध्ये निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी संगीता राजापूरकर यांनी केले. शिरुर तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत निवडणूक निर्णय अधिकारी राजापूरकर बोलत होत्या.
विधानसभा निवडणुकीसाठी शिरुर तहसील कार्यालयात येत्या 22 ऑक्टोबरपासून ते 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्विकारण्यात येणार असून, 30 ऑक्टोबर रोजी या उमेदवार अर्जाची छाननी होणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाल्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी रांजणगाव एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी पार पडेल.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रचार काळात आक्षेपार्ह विधाने, सोशल मीडिया व पेड न्यूज यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र पथके नेमण्यात आली असून, उमेदवारांनी सादर केलेला खर्च व प्रत्यक्ष व्हिडिओ चित्रीकरण करुन खर्चात आलेली तफावत याचे निरीक्षण करण्यासाठी पथके नेमण्यात आली असे राजापूरकर यांनी सांगितले.
या विधानसभा मतदारसंघात 459693 मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार 238897 तर महिला मतदार 220773 इतके आहेत. इतर 23 मतदार आहेत यापैकी शिरुर तालुक्यात 211409 असून हवेली तालुक्यात 348231 मतदार आहेत. 457 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान केंद्रावर वीज, पाणी व उन्हापासून संरक्षणासाठी व्यवस्था परिस्थितीनुसार करण्यात येणार असून, खोटी माहिती व अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याचा इशारा राजापूरकर यांनी दिला.
या निवडणुकीकरिता शिरुर तहसील कार्यालय येथे कंट्रोल रुमची उभारणी करण्यात आली आहे. शिरुर विधानसभा मतदारसंघात उमेदवारांना निवडणूक प्रचारादरम्यान आवश्यक त्या परवानगीसाठी शिरुर तहसील कार्यालयात एक खिडकी योजना सुरु केली असून, तिथे नायब तहसीलदार, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, पोलिस प्रशासन व अन्य विभागाचे अधिकारी उपलब्ध असणार आहेत, असे निवडणूक निर्णय अधिकारी राजापूरकर यांनी सांगितले.