उरुळी कांचन, (पुणे) : घेतलेले कर्ज व्याजासह परत करूनही जीवे मारण्याची धमकी देत बळजबरीने 18 गुंठे जमीन लाटणाऱ्या उरुळी कांचन (बिवरी) येथील एकाचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. प्रशांत विलास गोते (रा. बिवरी, ता. हवेली, जि. पुणे) असे अटकपूर्व जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विकास रामदास कटके (वय-30, रा. अष्टापुर, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी स्वप्नील राजाराम कांचन, राजाराम आबुराव कांचन (रा. ऊरुळी कांचन, ता. हवेली), प्रशांत गोते (रा. बिवरी, ता. हवेली) यांच्यासह आणखी दोन ते तीन जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास कटके यांनी 2019 मध्ये उरुळी कांचन येथील खाजगी सावकार स्वप्नील कांचन याच्याकडून व्याजाने सात लाख रुपये घेतले होते. कटके यांनी स्वप्नील कांचन याला 4 लाख 60 हजार रुपये दिले होते. मात्र, त्यानंतरही कांचन, गोते आणि त्यांचे इतर दोन साथीदार हे कर्जाच्या उर्वरित रकमेऐवजी कटके यांची शिंदवणे येथील वडीलोपार्जीत जमीन देण्यासाठी कटकेसह त्यांच्या कुटुंबातील लोकांना त्रास देऊ लागले.
त्यानंतर स्वप्निल कांचन, प्रशांत गोते व त्यांच्या सोबतच्या दोन अनोळखी साथीदारांनी बळजबरीने कटके यांना गाडीत टाकले. गाडीत टाकून त्यांना लोणी काळभोर हवेली क्र. 6 या सब रजिस्ट्रार कार्यालयात घेऊन जात विकास कटके व त्यांच्या कुटुंबियांना जिवे ठार मारण्याची धमकी देत शिंदवणे येथील 18 गुंठे जमीन प्रशांत गोते याच्या नावावर करून घेतली होती.
त्यानंतर कटके यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी स्वप्नील राजाराम कांचन, राजाराम आबुराव कांचन प्रशांत गोते, यांच्यासह आणखी दोघांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल केला होता. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून लोणी काळभोर पोलिसांनी स्वप्नील कांचन याच्या राहत्या घराची व कार्यालयाची झडती घेतली. या झडतीत रोख रक्कम 57 लाख 38 हजार 540 व 48 लाख 62 हजार 500 रुपयांचे सोन्याचे दागिने अशी एकूण 1 कोटी 6 लाखांची बेहिशोबी मालमत्ता तसेच इतर महत्वाचे दस्तऐवज मिळून आले होते. याप्रकरणी पोलिसांनी स्वप्नील कांचन याला अटक केली होती.
दरम्यान, या प्रकरणी पोलीस कारवाई टाळण्यासाठी प्रशांत गोते याने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. मात्र, उच्च न्यालायलाने त्याचा अटकपूर्व जामिन फेटाळला. जामीन अर्ज फेटाळल्याने लोणी काळभोर पोलीस काय कारवाई करणार? याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
कटकेंची फसवणूक झाल्याचे न्यायालयात उघड
विकास कटके व त्यांच्या कुटुंबांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून बळजबरीने खरेदीखत करून घेण्यात आल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले. तसेच प्रशांत गोते हा कोणतेही सबळ पुरावे देऊ न शकल्याने कटके यांची फसवणूकच झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे न्यायालयाने प्रशांत गोते याला जामीन देण्यास नकार दिला. आता हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी प्रशांत गोते याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.