लोणी काळभोर: थेऊर (ता. हवेली) येथील मागील तेरा वर्षांपासून बंद असलेला यशवंत सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी विरोधी गट कारखान्याची एक इंच जागा शिल्लक ठेवणार नाही. कारखान्याची सर्व जागा त्यांच्या बिल्डर मित्रांना विकून टाकतील, असा घणाघात कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक प्रकाश जगताप यांनी नाव न घेता अण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनलवर केला.
सोरतापवाडी (ता. हवेली) येथे यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात रविवारी अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीच्या पॅनल प्रमुखांसह उमेदवार व कार्यकर्ते यांची एक कोपरा सभा झाली. यावेळी बोलताना प्रकाश जगताप यांनी वरील आरोप केला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रशांत काळभोर, संतोष आबासाहेब कांचन, ग्रामपंचायत सदस्य राहुल काळभोर, अमर काळभोर, ताराचंद कोलते, मोरेश्वर काळे, विजय चौधरी, सागर चौधरी, कृषिराज चौधरी, शशिकांत चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रकाश जगताप पुढे म्हणाले, शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन अण्णासाहेब मगर यांनी थेऊर येथे यशवंत सहकारी साखर कारखाना उभारला. २०११ मध्ये हा कारखाना बंद पडला. हा कारखाना सुरु करून शेतकऱ्यांचा विकास व्हावा, यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करत होतो. आता या सर्व पाठपुराव्यांना यश आले आहे. कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार सुरु करण्यापूर्वी थेऊर येथील चिंतामणी गणपतीला नारळ वाढवून व आण्णासाहेब मगर यांना अभिवादन करून प्रचार सुरु केला. मात्र, विरोधी पॅनलने भाग्यविधाते आण्णासाहेब मगर यांना डावलून निवडणुकीचा प्रचार सुरु केला. यावरून असे दिसून येते की, त्यांना फक्त कारखान्याची जमीन हडप करायची आहे.
शेतकरी विकास आघाडीमधील उमेदवार नवीन आहेत, परंतु सुशिक्षित आहेत. आम्ही घरोघरी जाऊन मतदारांना भेटतो तेव्हा मतदारांची उत्स्फूर्त साथ मिळत आहे. मतदार राजाने कल आम्हाला दिला आहे. या निवडणुकीत आमचा विजय नक्की आहे. आम्ही हा कारखाना कसा सुरु करतो, ते तुम्हाला दाखवितो. तसेच चांगला चालवूनही दाखवितो. त्यामुळे सर्व मतदारांनी अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला भरघोस मतदान करून निवडून द्यावे, असे आवाहन जगताप यांनी केले आहे.
बंद पडलेला यशवंत कारखाना मागील तेरा वर्षांपासून वर्षापासून विरोधी पॅनलला सुरु करता आला नाही. यांच्यावर सभासदांनी किती विश्वास ठेवायचा? सभासद आता त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्या पॅनलमध्ये खरेदी विक्री करणारे मंडळी आहे. ही खरेदी विक्री करणारी मंडळी जर या कारखान्यावर आली, तर कारखान्याची जमीन कुठल्याही संस्थेला न देता ही मंडळी बिल्डर मित्रांना देतील. प्रदूषणाच्या नावाखाली राहिलेला कारखाना बंद पाडतील. विरोधी पॅनेल कारखान्याची जमीन गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही, असेही जगताप यांनी स्पष्ट सांगितले.