पुणे: महाराष्ट्रात उभे राहिलेले मराठा आरक्षण आंदोलन जिरवायचे नसेल तर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना निवडणूक लढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले. सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असे भांडण लावण्यात आले आहे. वंचितची (vanchit Bhaujan Aghadi) भूमिका आहे की, मराठा आणि ओबीसी समाजाचं आरक्षणाचं ताट वेगवेगळं असेल. मराठ्यांचे ताट वेगळे व्हावे, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) लढत आहेत. त्यांना माझा सल्ला आहे की, मराठा आरक्षण आंदोलन थांबवायचे नसेल तर त्यांना निवडणुकीत लढण्याशिवाय पर्याय नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. ते मंगळवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.
महाविकास आघाडीशी युती होईल का सांगता येत नाही
आगामी लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. येत्या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. देशात पुन्हा नरेंद्र मोडी यांचे सरकार येणार नाही, याची दक्षता घ्या. निवडणुकीच्या काळात देशात दंगली घडवण्याचा प्रयत्न होईल. अनेक नेत्यांची पळवापळवी होईल. पण हाच मतदार ठरवेल की, उद्या सत्तेवर कोण बसणार? उद्या महाविकास आघाडीसोबत युती होईल की सांगता येत नाही. पण युती व्हावी, अशी आमची इच्छा आहे. काही झालं तरी आपलं गणित पक्कं करुन घ्यायचे आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.