युनूस तांबोळी
शिरूर : जांबूत ( ता. शिरूर ) येथील जय मल्हार हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी आठवडे बाजार भरविला होता. आठवडे बाजारात मिळणाऱ्या सर्व पाले भाज्या सहित दैनंदिन वस्तू या ठिकाणी विद्यार्थ्यांनी विकण्यासाठी ठेवल्या होत्या. विद्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञान मिळावे यासाठी हा आठवडे बाजार भरला होता.ग्रामस्थांनी या बाजारात गर्दी केली होती. एक विद्यार्थी आपल्या पाले भाज्यांची जाहिरात करत होता.
मालक घ्या ना …अगदी स्वस्त लावली भाजी, रातभर पाणी देऊन भल्या सकाळीच काढून आणलीया. गावरान अन ताजी हाय या मध्ये काय शंकाच नाय. बाजारात कुठेही मिळणार नाय. याची ग्यारंटी देतो. त्यावर त्या ग्रामस्थांने तातडीने ती भाजी विकत घेतली अन त्या विद्यार्थ्याला शाबसकी दिली.हुशार शेतकरी दिसतोय असे ही तो ग्रामस्थ म्हणाला.
दुसऱ्या विद्यार्थ्यांने तुरीच्या शेंगा आणल्या होत्या. किलो दोन किलो असणाऱ्या शेंगा त्याने आणलेल्या फ्लास्टिक च्या कागदावर ठेवल्या होत्या. जवळपास बाजारात पन्नास रूपये किलोने मिळणाऱ्या शेंगा त्याचे जवळपास शंभर रूपये त्याला मिळणे अपेक्षित होते. पण तो फक्त तुरी च्या शेंगा तुरीच्या…अशिच हाक मारत होता. एका ग्रामस्थांने ते हेरले.कशा किलो दिल्या शेंगा म्हणत…विद्यार्थ्याला प्रश्न केला.
त्यावर विद्यार्थी म्हणाला की, अहो शेतकऱ्याकडे कसला आला काटा किलो मोजायला. उधड्या देऊन टाकू म्हणतोय. मग कशा देणार सर्व…त्यावर तो विद्यार्थी म्हणाला न्य़ा मग विस रूपयाला सर्व. तशा त्या ग्रामस्थाने खुषीत विकत घेतल्या.हे सर्व दृश्य पहाणाऱ्या शिक्षकाने मात्र त्या विद्यार्थ्याला कमी पैशात शेंगा दिल्याने जाब विचारला.
त्यावेळी विद्यार्थी म्हणाला, सर शेतकऱ्यांजवळ बाजारात बसायला येवढा वेळ आहे काय ? उन्हातान्हात बसण्यापरी कांद्यावर पाणी द्यायला जायचय
हाय. असू द्या वानवळा. शेतकऱ्याच असच असतया. पिकल्यावर पसा पसा वाटायलाच जातय. अस म्हणत हसतच त्या विद्यार्थी शेतकऱ्याने काढता पाय घेतला. त्यावर तेथे चांगलाच हशा पिकला. या शेतकरी विद्यार्थ्याला व्यवहारिक ज्ञान कसे द्यावे हाच प्रश्न तेथील शिक्षकाला पडला असेन ना.