यवत: दौंड तालुक्यातील महसूल विभागासंबंधित विविध प्रश्नांसंदर्भात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन, मुंबई येथे आज (दि.१) बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महसूल विभागाशी विविध प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले.
दौंड तालुका नाट्यगृहासाठी आवश्यक जागेचा प्रस्ताव महसूल विभागात प्रलंबित असून सदर प्रस्ताव मंत्रिमंडळ मान्यतेसाठी सादर करण्यात यावा, तसेच अधिकारी निवासस्थाने बांधकाम करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत १५ दिवसांच्या आत जागा मागणीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ मान्यतेसाठी सादर करावा, असे आदेश मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.
दौंड तालुका स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरु करण्यात आले असून त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती व अधिकारी वाहनांची व्यवस्था करण्यात यावी, याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देखील दिले आहेत. तसेच उजनी धरणाच्या संपादित क्षेत्रात येणाऱ्या खानोटा गावाचे अंशतः पुनर्वसन झाले असून उजनी धरणाच्या फुगवटा क्षेत्रातील ओलाव्यामुळे बाधित घरांचे संपादन व पुनर्वसन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी केली असता याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी, पुणे यांनी प्रांत व तहसीलदार यांच्या समवेत बैठक घेत, स्थळ पाहणी करून आवश्यक त्या जागेचे प्रस्ताव पाठवावेत व पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करावी.
दौंड तालुक्यातील भांडगाव येथील पुणे-सोलापूर महामार्गाचे भूसंपादन चुकीच्या पद्धतीने झाले असून, त्यामध्ये शेतकरी बाधित झालेले आहेत. त्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा व चुकीच्या पद्धतीने झालेले भूसंपादनातून मार्ग काढावा, अशी मागणी राहुल कुल यांनी केली. याबाबत पुणे जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व भूसंपदान अधिकारी यांनी त्यांच्या स्थरावर बैठक घेऊन तातडीने मार्ग काढावा, असे निर्देश मंत्री राधाकृष्ण पाटील यांनी दिले.
यावेळी आमदार जयकुमार गोरे, महसूल विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, सहसचिव संतोष गावडे, श्रीराम यादव, सुनील कोठेकर, पुण्याचे अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, अवर सचिव संजय जाधव, दौंडचे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार अरुण शेलार, भूमि अभिलेख उप अधीक्षक धनराज शिंदे, भूसंपादन अधिकारी वनश्री लाभषेटवार, दौंड नगरपालिकाचे मुख्याधिकारी विद्या पोळ, उजनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आदी उपस्थित होते.