पुणे : पुण्यातील आंदोलनात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले होते. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पुण्याचे पोलिस आयुक्तांना दिले आहेत. तसेच, पीएफआय या संघटेवर बंदी घालणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फडणवीस म्हणाले की, देशात आणि महाराष्ट्रात कुठेही पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा खपवून घेतल्या जाणार नाहीत. अशा प्रकाराची घोषणा आम्हाला मान्य नाही. मी पोलिस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितले आहे की, देशद्रोहाचा गुन्हा अशा लोकांवर दाखल केलाच पाहिजे. पीएफआयचा जो तपास सातत्याने गेली काही वर्षे पुरावे जमा करुन करण्यात आला आहे. वेगवेगळया राज्यांना काम केले आहे. मागच्या काळात मी गृहमंत्री असताना, राज्यात त्यांच्या कारवायांची नोंद घेतली जात होती. आता पोलिसांकडून त्यांचा तपास केला जात होता.
राज्यात जो कोणी पाकिस्तानचे नारे लावेल, त्यांना आम्ही सोडणार नसून, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करु, असा इशारा देखील फडणवीस यांनी दिला. याबाबत आयुक्तांसोबत आमची चर्चा झाली. याबाबत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा लागेल, असे सांगितल्याचे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, नाना पटोले दिवसभरात अनेक विनोद करीत असतात. ते ऐकायचे आणि त्यांचा आनंद घ्यायचा, असा टोल हाणून त्यांनी त्यांच्या विनोदावर आम्हाला प्रतिक्रीया का विचारता, असा सवाल करुन पटोले बेताल बोलतात, असा घणाघणात केला. आणि अशा बेताल व्यक्तीला उत्तर देण्याइतका माझ्याकडे वेळ नाही, असे फडणवीस म्हणाले.