दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील कालठण ते वरकुटे बुद्रुक रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. त्याच्यात सुधारणा व्हावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी मात्र वेगळाच राग आलापत आहेत.
कालठण नं. १ ते वरकुटे बुद्रुक या साडेचार किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरु आहे. या कामात रस्त्याचे मुरुमीकरण व रुंदीकरण करण्यात येणार आहे. मात्र ते काम दर्जेदार पध्दतीने होत नाही असा स्थानिकांचा आक्षेप आहे. या संदर्भात बनकरवाडी गावचे रहिवासी व काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास शेळके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी तक्रार ही केली आहे.
या रस्त्याच्या बाजुपट्ट्यांचे खडीकरण करुन त्यावर रोलर फिरवून पाणी मारले गेले पाहिजे. पूर्ण रस्त्याचे मुरुमीकरण झाले पाहिजे अशी शेळके यांची मागणी आहे. त्यांनी तक्रार केली आहे. मात्र कामाची पध्दत जैसे थे अशीच आहे, असे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले.
पत्रकारांनी शेळकेंसमवेत रस्त्याच्या कामाला भेट दिली. त्यावेळी करेवाडी ते कालठण नं.१ या पट्ट्यातील रस्त्यावर खडी अंथरली आहे. त्याखाली डांबर अभावानेच दिसत असल्याचे स्पष्ट दिसून आले.पायाने उकरले तरी खडी बाजूला होताना आढळली. बाजुपट्ट्या भरल्या नसल्याचे ही निदर्शनास आले. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील शेंडगे नावाचा ठेकेदार हे काम करत आहे. दर्जाहीन काम होत असल्याने सदरचे काम ग्रामस्थांनीच बंद पाडले होते.
दरम्यान, वरकुटे ते करेवाडी या पट्टयात डांबरीकरणावर डांबरीकरण आहे. करेवाडी ते कालठण नं.१ या रस्त्याची रुंदी ३ मीटर वरुन ३.७५ पर्यंत वाढवण्यात येणार आहे. दोन्ही बाजूला ३४.५० खडीकरण करायचे आहे. पूर्ण रुंदीला एनबीएम आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली.
▪ एवढे मोठे काम आम्हाला काही नको का?
डांबरीकरणाच्या कामात डांबर पक्के होण्यासाठी काही कालावधी जावा लागतो. मात्र कालठण नं.१ येथील एका इसमाने काल केलेल्या कामावर ट्रॅक्टर चालवला आहे. एवढे मोठे काम आहे, मग त्या कामाचे आम्हाला काही नको का, या शब्दात त्याने आपला हेतू स्पष्ट केला. त्यामुळे ठेकेदाराने हे कामच आपल्याला नको अशी भूमिका घेतली आहे, असे ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने पत्रकारांशी बोलताना सांगितले.