Politics | पुणे : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालावर सर्वांचेच लक्ष लागून आहे. 16 मार्च रोजी सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर घटनापीठानं आपला निकाल राखून ठेवला आहे. एखाद्या मोठ्या प्रकरणाची सुनावणी घटनापीठानं पूर्ण केल्यानंतर निकालाला किमान एक महिना लागतो.
17 एप्रिल ते 14 मे या महिनाभराच्या काळात कधीही निकाल…
त्यानुसार या निकालाची संभाव्य तारीख समोर आली आहे. या प्रकरणाचा निकाल 17 एप्रिल ते 14 मे या महिनाभराच्या काळात कधीही निकाल लागण्याची शक्यता आहे. सत्तासंघर्षाच्या या निकालावरच महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.
महत्वाच्या विषयांवरील निकाल येण्यासाठी जास्तीत जास्त किती कालावधी लागेल याची काही शाश्वती नसते. पण या केसमधील एक न्यायमूर्ती निवृत्त होत असल्यानं किमान त्याआधी निकाल लागेल, अशी शक्यता आहे. तसेच 20 मे पासून सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळी सुट्ट्याही सुरु होत आहेत. 20 मे ते 2 जुलै अशी सुप्रीम कोर्टाची सुट्टी असणार आहे.
त्यामुळे एप्रिल शेवटचा आठवडा किंवा मे च्या पहिल्या आठवड्यापर्यंत कधीही निकालाची शक्यता आहे,मात्र असं असलं तरी महिनाभरात निकाल दिलाच पाहिजे, असं कोणतंही बंधन सुप्रीम कोर्टावर नाही. सुप्रीम कोर्ट एखाद्या प्रकरणाचा निकाल देणार, हे आदल्या दिवशीच जाहीर केलं जातं. कोर्टाच्या कामकाज यादीत एक दिवस आधी निकालाची ही तारीख येते.
काय आहे प्रकरण…
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत फूट पडली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तसेच बंडामुळे सरकार देखील अल्पमतात आले. राज्यात सत्तांतर झाले. शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. या प्रकरणाचा सत्तासंघर्ष गेले ८ महिने सुरु आहे. या प्रकरणाची मॅरेथॉन सुनावणी 16 मार्च 2023 रोजी पूर्ण झाली. या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने निकाल राखून ठेवला आहे.