Wadeshwar Katta : पुणे : पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे यांच्या पुढाकाराने गेल्या पंधरा वर्षांपासून वाडेश्वर कट्टा या नावाने विविध क्षेत्रातील मान्यवरांची मैफिल आयोजित करण्यात येते. यंदाच्या दिवाळीत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अंकुश काकडे, श्रीकांत शिरोळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे, राष्ट्रवादी (अजित पवार पवार) गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे, आपचे राज्य उपाध्यक्ष विजय कुंभार, भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, आर.पी.आय.चे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मंदार जोशी, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मेघना काकडे माने अशा सर्व पक्षातील राजकीय पदाधिकारी व नेते उपस्थित होते.
प्रत्येक पक्षाची वेगळी विचारसरणी, व्यक्ती तेवढ्या प्रकृती, असे म्हटले जाते. मात्र, पुणेकरांनी अशा प्रकारच्या उपक्रमांमधून पुण्याची राजकीय सभ्यता जपली आहे. पुण्याची प्रगल्भ राजकीय संस्कृती आणि सुसंस्कृतपणा येथील सर्वच राजकीय मंडळींमध्ये दिसून येतो. राजकीय विचारांमध्ये भिन्नता असली, तरी त्याला वैर म्हणता येणार नाही, हेच या उपक्रमांमधून दिसून आले, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
पवार कुटुंब दीपावली साजरी करायला एकत्र आले, यात काहीच गैर नाही. वेगवेगळ्या पक्षात असूनही व्यवसाय एकत्र करणे, सण एकत्र साजरे करणे यातूनच कटुता संपते, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. वाडेश्वर कट्ट्यावर सर्व राजकीय मंडळींनी मतभेद बाजूला ठेवत मनमोकळ्या गप्पा मारल्या. या वेळी विविध पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या राजकीय टोलेबाजीमुळे उपस्थितांची करमणूक झाली.
दरम्यान, गेल्या वर्षभरात राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली. पक्षांची विभागणी गटातटांमध्ये झाली. यामुळे पूर्वीच्या सहकाऱ्यांनी आणि आताच्या विरोधकांनी एकमेकांना राजकीय चिमटे काढत आणि टोमणे मारत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. पण कटुता बाजूला ठेवून हसत खेळत सर्वांनी हा कार्यक्रम खेळीमेळीत साजरा केला.
संयोजक अंकुश काकडे म्हणाले की, विविध राजकीय विचारसरणीच्या सगळ्यांनी एकत्र येऊन गप्पांचा फड रंगविला. एकत्र बसून गप्पा मारत वडे, उपमा, शिरा इत्यादी पदार्थांचा मनमुराद आस्वाद घेतला. एकंदरीत सगळीकडे आरोप प्रत्यारोपाने राजकीय वातावरण गढूळ झाले असतानाच खेळीमेळीत झालेल्या या कार्यक्रमामुळे पुण्याच्या राजकीय प्रगल्भतेचे दर्शन या वेळी घडले.