Political News : पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असताना रेमडेसिव्हीर औषधांचा तुटवडा जाणवत होता. अनेक ठिकाणी अव्वाच्या सवा पैसे देऊन रेमडेसिव्हीर खरेदी करण्यात येत होते. लसीचा काळाबाजार सुरू होता. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असताना आरोग्य विभागाने रेमडेसिव्हीर औषधाची खरेदी करून पुणे शहर व जिल्ह्याला २ लाख ४० हजार व्हायल्स वितरित केल्या. मात्र, ती व्हायल्स कालबाह्य झाली.
तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
दरम्यान, औषधांचा साठा मुदतबाह्य होणार असल्याचे कळवूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे या ३० कोटींच्या रेमडेसिव्हीर औषधाच्या कालबाह्य साठ्याबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा, आरोग्य संचालकांचे निलंबन करावे, अन्यथा न्यायालयात, लाचलुचपत विभागाकडे दाद मागणार तसेच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हेमंत संभूस यांनी दिला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोग्य विभागाने खरेदी केलेल्या रेमडेसिव्हीरच्या साठ्यापैकी ४६ टक्के साठा पुणे शहर, जिल्ह्याला वितरित केला. साठा कालबाह्य झाल्याचे आरोग्य संचालक नितीन अंबाडेकर यांना कळवण्यात आले होते. त्यांनी दखल घेतली नाही.
याबाबतची तक्रार आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे केल्यावर त्यांनी समिती स्थापन केली. या समितीने अहवाल दिला. त्यातून साठा कालबाह्य झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार देऊनही कार्यवाही झाली नाही. खरेदी-विक्रीत मोठा घोळ झाला आहे. त्याला आरोग्यमंत्री आणि आरोग्य संचालक जबाबदार आहेत. नागरिकांच्या पैशांचा गैरवापर करण्यात आला आहे, असा आरोप संभूस यांनी पत्रकार परिषदेत केला.